राजकुमार जोंधळे
एप्रिल उजाडला की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महोत्सवाची महिनाभर रेलचेल असते. या निमित्ताने संभाजीनगरचेे (औरंगाबाद) मुक्त पत्रकार बी. व्ही. जोंधळे यांचा 14 एप्रिलच्या लोकसत्तात "बौध्द-मातंग भेदनीति कशासाठी?' या मथळ्याखाली लेख प्रकाशित झाला. सदर लेखात जोंधळे यांनी मांडलेल्या अवास्तव बाजू आणि प्रकाशात न आणू इच्छिणाऱ्या विविध पैलूंवर टाकण्यात आलेला हा प्रकाश...
महार की बौध्द? हा विषय तसा गहन आहे. धर्मांतरानंतर आजही महार मंडळी महार म्हणूनच महाराष्ट्रात राहताहेत. बाहेर सांगताना आम्ही बौध्द आहोत, असे म्हणतात. कागदोपत्री आजही "हिंदू-महार' म्हणूनच काहींच्या दाखल्यावर स्पष्ट नोंद आहे. मग बौध्दपणाचा दिखाऊपणा कशासाठी? केवळ आरक्षण आणि अनुसूचित जातींसाठी मिळणाऱ्या सवलती लाटण्यासाठीच स्वत:चे बौध्दत्व झाकण्याचा प्रयत्न महार मंडळींकडून होताना दिसून येतो आहे.
एप्रिल महिना उजाडला की, बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाचे आकलन स्वत:ला बौध्द समजणाऱ्या काही महार मंडळींना होते. बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर किती महार मंडळी आज मार्गक्रमण करू लागली आहेत? हा ज्यांच्या त्यांच्या आत्मपरीक्षणाचा विषय आहे. खरंच आपण महार की बौध्द? हे ठरवण्याची वेळ आता आली आहे.
आरक्षण, शासनाकडून मिळणाऱ्या सोयी आणि सवलतींसाठी आजही महार समाज हिंदू धर्म सोडायला तयार नाही. कागदोपत्री बौध्द होता येत नाही. आचार, विचार आणि दैनंदिन जीवनात बुध्दांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर जगणे यालाच बौध्द म्हणता येईल. सकाळी उठून अगदी उर्मट भाषेत "जयभीम' म्हणणे म्हणजे आंबेडकरवादी आणि बौध्द अशी व्याख्याच करता येत नाही. तरीही आम्ही अगदी शुध्द भाषेत सांगतो की, आम्ही बौध्दच आहोत. बुध्दाला अंधश्रध्दा, देवपूजा आणि थोतांडपणा मान्य नव्हता. आपण मात्र या तत्त्वज्ञानाच्या, विचारांच्या अगदी विरुध्द दिशेनेच मार्गक्रमण करतो. महार मंडळींनी आपण महार की बौध्द? हे स्वत:च आत्मपरीक्षणांती ठरवावे.
महार-मांग यांच्यातील पारंपरिक तेढसंभाजीनगरच्या बी. व्ही. जोंधळेंनी कॉंग्रेसची "भाटगिरी' करणारे लेख लिहिल्याप्रकरणी "भारिप बहुजन'च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. ही भाटगिरी उघड उघड करणाऱ्या जोंधळेंचा स्वाभिमान तेव्हा कुठे गेला होता? स्वत:चे वागणे लाचार असतानाही मातंग, चर्मकार समाजाला लाचार म्हणण्याचे धाडस जोंधळेंनी करणे म्हणजे महा-लाचारीचेच लक्षण आहे. महार समाज बाबासाहेबांच्या पश्चात मोठ्या स्वाभिमानाने आणि पोटतिडकीने शिकला, हे मान्य करावेच लागेल. आरक्षणाच्या माध्यमातून जे पात्र ठरले, त्या महारांना शासकीय नोकऱ्या मिळाल्या. त्याउलट मातंग समाजातील मंडळी अल्प प्रमाणात शिक्षित झाली. त्यामानाने त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकऱ्यांत स्थान मिळाले. मात्र महार स्वाभिमानी आणि मातंग, चर्मकार हे लाचार, कानाखालचे म्हणून हिनवणे ही समाजात जाणीवपूर्वक भेदनीती आणण्याचीच भाषा नव्हे काय?
महार मंडळी आजही मांगांना आणि चर्मकारांना नीचतेची वागणूक देतात. दोन्ही जातींना हिंदूंनी अस्पृश्य ठरविले असतानाही महार कसे काय गंगेत न्हालेले आहेत? धर्मांतराने महारांचे शुध्दीकरण झाले असे मानले जाते. मात्र, आचरणात आणि विचारांत, वागण्यात कुठलेच शुध्दीकरण झाले नसल्याचे दिसून येते. आजही महार-मांगांतील पारंपरिक तेढ कायम आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या किती तुकड्यांत मातंग समाजाचे कार्यकर्ते आणि पुढारी काम करतात? किती मातंग, चर्मकार समाजाला रिपाइंने सत्तेतला वाटा मिळवून दिला आहे? सत्ता, संपत्ती आणि आरक्षणाच्या लाभापाई एकजुटीच्या माध्यमातून अन्य जातींना अपात्र ठरवीत आपणच डल्ला मारायचा, ही मानवतावादी वागणूक कशी समजायची?
मातंग आणि चर्मकारांना ताटाखालचे, कानाखालचे आणि लाचार समजणाऱ्या जोंधळेंना रिपाइं आणि अन्य दलित संघटनांचे नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या किती पुढाऱ्यांच्या घरी सध्याला पाणी भरून "महारकी' करतात, याचा हिशेब का मांडता आला नाही? कारण त्यांची मतलबी पत्रकारिता आड आल्याचे त्यातून स्पष्ट दिसून येते. महार-मांग वतन परिषद धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळेत बाबासाहेबांच्या उपस्थितीत झाली होती. बाबासाहेबांनी कसबे तडवळेत महार-मांगांच्या प्रश्नांवर आपले विचार मांडले होते. बाबासाहेबांना वाटायचे, महाराष्ट्रातले हे दोन समाज जर एकसंघ झाले, तर सत्तेतला निम्मा वाटा मिळविण्यास वेळ लागणार नाही. मात्र, बाबासाहेबांच्या या मताचा महार मंडळींनी त्यांच्या पश्चात तरी किती आदर केला? बाबासाहेबांनी ज्या कॉंग्रेसला "जळते घर' म्हटले होते, त्याच घरात अख्ख्या महाराष्ट्रातला महार, बौध्द समाज दलित पुढाऱ्यांनी नेऊन ठेवला आहे. काही बोटांवर मोजता येतील अशी स्वाभिमानी असतील, मात्र लाचार आणि सत्तेची दुकानदारी चालविण्यासाठी अखंडपणे कॉंग्रेसची "महारकी' करणाऱ्या पुढाऱ्यांमुळे ते हतबल झाले आहेत. परिणामी ही स्वाभिमानी मंडळी आता बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून दलित समाजात नवे परिवर्तन आणण्यासाठी धडपडू लागली आहेत. ही धडपडही काही दलित पुढाऱ्यांना धोकादायक वाटत असल्याने तीही मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. हाच त्यांचा आंबेडकरवादी आणि बुध्दाचा मानवतावादी मार्ग आहे का?
महार-मांगांतील ही पारंपरिक तेढ बाबासाहेबांना कसबे तडवळे येथील महार-मांग वतन परिषदेच्या माध्यमातून संपुष्टात आणायची होती. मात्र, बाबासाहेबांना महार मंडळींकडून कुठलेही सहकार्य त्याकाळी मिळाले नाही. परिणामी बाबासाहेबांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले. ती तेढ आजही कायम आहे. आता या तेढीची, भेदाची व्याप्ती वाढली आहे.
अन्य दलितांसाठी महारांचे योगदानदलित समाजात महार, मांग, चांभार, ढोर आणि तत्सम जाती, पोटजातींचा समावेश आहे. सध्याला महार, बौध्द समाजाने आरक्षणाच्या माध्यमातून आपला विकास साधला आहे. मात्र, महार मंडळींचे अन्य दलितांसाठी कुठले योगदान आहे? हा सवाल आता अन्य दलित जाती-जमातींना पडला आहे. महारांनी आपल्या फायद्यासाठी अन्य दलितांना पुढे येऊच दिले नाही. पुढारलेला समाज, जात म्हणून अन्य जातींना पुढे आणण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी त्यांच्या चळवळींना बळ देण्याचे काम महारांनी कधी केलेच नाही. उलट त्यांच्या विकासात अडसर निर्माण करून त्यांच्या जागा एकजुटीच्या बळावर बळकावण्याचे काम केले आहे. सरकारी नोकऱ्यांत उच्च पदावर बसलेल्या बौध्द-महार अधिकाऱ्यांकडून ही भेदनीति अधिक पोसली गेली आहे. परिणामी हे महार आणि अन्य दलित जातींतील तेढ, भेदनीति मोठ्या प्रमाणावर कायम आहे. मग आयोगाने दिलेल्या अहवालानुसार मातंग समाजाला 8 टक्के वेगळे आरक्षण मिळत असेल आणि त्यांची प्रगती होत असेल तर महार, बौध्द मंडळींची ही पोटदुखी कशासाठी? आजपर्यंत अन्य जातींच्या भल्यासाठी आणि प्रगतीसाठी सुधारलेला, पुढारलेला समाज म्हणून महारांनी कोणते असे योगदान दिले आहे? स्वत:च्या अस्ितत्वासाठी मातंग आणि अन्य दलित जाती धडपडत असतील तर महारांचा हा कोलदांडा कशासाठी? यातून उलट महारांविषयीच्या तिरस्काराची, गैरसमजुतीची आणि तेढाचीच भावना अधिक दृढ होईल. मग या भेदनीतिला कोण जबाबदार आहे, ते महार मंडळींनीच ठरवावे.
चाकूर तालुक्यातील नरसिंग नाईकवाडे खून प्रकरणउजळंब, ता. चाकूर, जि. लातूर येथील मातंग समाजातील नरसिंग नाईकवाडे हे आंबेडकरवादी विचाराने झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या मुलांना आंबेडकरी चळवळीत काम करण्यासाठी पाठबळ दिले. त्यातूनच त्यांनी अनेकदा गावातील सवर्णांशी संघर्ष केला. गावातील मंदिर प्रवेशासाठी आणि आंबेडकर जयंतीसाठी सवर्णांशी वेळप्रसंगी दोन होत केले. त्यातूनच त्यांचे पुत्र सतीश नाईकवाडे हे दलित विद्रोही कवी, लेखक म्हणून पुढे आले. नरसिंग नाईकवाडे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जागेसाठी गावातल्या मुख्य चौकात फलक रोवला होता. मग सवर्णांचे माथे भडकले. या प्रकरणाचा राग सवर्णांनी मनात धरून त्यांच्याच भावकीत भांडणे लावून दिली. या भांडणातून नरसिंग नाईकवाडे यांचा खून झाला. ही वास्तवता माहीत असतानाही उजळंबच्या किती महारांनी नाईकवाडे कुटुंबाला सहकार्य केले? उलट सदर खून प्रकरण दडपण्यासाठी काही महार मंडळींनी गावातील सवर्णांना मदतच केली. आंबेडकरांच्या विचारांसाठी नरसिंग नाईकवाडेंचा दिवसाढवळ्या मुडदा पाडला जातो आणि महार मंडळी ही बघ्यांची भूमिका घेतात, ही भेदनीति नाही का?
अनिता बसवंते बलात्कार-खून प्रकरणकंधार तालुक्यातील अनिता बसवंते बलात्कार, खूनप्रकरणी एकाही महाराच्या, बौध्दाच्या संघटनांनी, पुढाऱ्यांनी आंदोलन अथवा निषेध नोंदविणारे साधे पत्रकही काढले नाही. या प्रकरणात एकट्या मातंग समाजानेच लढा दिला. म्हणजे मातंगांवर अन्याय झाला तर महारांनी बघ्याची भूमिका घ्यायची, ही भेदनीति नाही का? जर याप्रकरणी महार, बौध्द मंडळींनी एकजूट दाखवली असती तर आरोपींना कडक शासन झाले असते. ज्या-ज्यावेळी मातंगांवर अन्याय, अत्याचार झाले, गावोगावी मातंगांचे मुडदे पाडले गेले, त्या-त्या वेळी महारांनी बघ्याची भूमिका घेत चक्क सवर्णांची बाजू घेण्यातच धन्यता मानली आहे. यातून दोन समाजात सख्य कसे काय नांदू शकते? याचे बी. व्ही. जोंधळें यांनी आत्मपरीक्षण करावे. लोण्यात कढवल्यासारखे लेख लिहिणे सोपे असते, मात्र वास्तव भयानक, भयावह आहे. त्याचा स्वीकार करावाच लागेल.
दिलीप शेंडगे जळीत हत्याकांडजालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील भुतेगावच्या दिलीप शेंडगेला केवळ बहिणीची अब्रू वाचविण्यासाठी सवर्णांशी दोन हात केल्याप्रकरणी गावातील काही लोकांनी बेदम मारहाण करून जिवंत जाळून त्याला ठार मारणात केले. या प्रकरणात किती महारांनी रस्त्यावर येऊन त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला? या प्रकरणात महारांनी कुठलीच ठोस भूमिका घेतली नाही अथवा निषेध करणारे पत्रकही काढले नाही. उलट याप्रकरणी दलित समाजातील काही मोठ्या संघटनांनी आर्थिक तडजोड करून प्रकरण मिटवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.
सदर प्रकरणात जालना जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या महाविद्यालयात प्राध्यापक असणारा आणि त्याचे अन्य साथीदार केवळ दलित पुढाऱ्यांच्या लाचार आणि आर्थिक तडजोडीमुळे निर्दोष सुटले आहेत. जालना जिल्ह्यात एकाही दलित अत्याचार प्रकरणात कोणाही सवर्णाला आतापर्यंत शिक्षा झाल्याची नोंद नाही. परिणामी अशा प्रकरणात मुंबई, नागपूर आणि औरंगाबादसह काही स्थानिक संघटना "मॅनेज' होतात. या वागण्याच्या पध्दती जाणीवपूर्वकतेच्या माध्यमातून आल्या आहेत. अशातून भेदनीति पोसली जाणार नाही तर काय? याला जबाबदार केवळ मातंग समाजच कसा काय आहे? त्या पाठीमागची वास्तवता आणि खरी परिस्थिती बौध्द मंडळी समजून घ्यायला तयारच नसतात. "आपला तो बाळू अन् लोकांचे ते कार्टे' अशातलाच हा प्रकार आहे. वरून आम्ही मानवतावादी आहेत, असा आव आणला जातो.
महारांची दादागिरी...महाराष्ट्रात महार समाजाने केलेली आंदोलने नोंद घेण्यासारखी आहेत. ज्या-ज्यावेळी महारांवर अन्याय-अत्याचार झाला, त्याचक्षणी महार समाजातील युवक मोठ्या संतापाने रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या पाठीमागे असलेल्या दलित संघटनांच्या पुढाऱ्यांचा वरदहस्त हा महत्त्वाचा आहे. या पुढाऱ्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच ही आंदोलने जन्माला आली आणि समाजाच्या पदरी न्याय पडला. मात्र, अशा आंदोलनातून महारांनी दादागिरीचेच प्रदर्शन अधिक केल्याचे दिसून येते. ही दादागिरी अन्य दलितांसाठी केली असती, तर ही भेदनीति आणि गैरसमज आज निर्माण झाले नसते. समाजावर अन्याय-अत्याचार झाले की मग सुरू झाली जाळपोळ आणि प्रचंड दगडफेक. यातून महारांनी स्वत:ची प्रतिमा ही आक्रमकतेची निर्माण केली असेल, मात्र याच दादागिरीचा वापर त्यांनी दलितांतल्या अन्य जातींवर करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणात, सत्तेत अन्य दलितांविरुध्द कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा करून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. शेवटी कॉंग्रसने या मंडळींना कुठे आणि कुठपर्यंत सत्तेत ठेवायचे, याचे नियोजन केल्याचेही या मंडळींच्या लक्षात आले आहे. तरीही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची लाचारी म्हणण्यापेक्षा "महारकीच' साेडायला हे तयार नाहीत. राजकारण व सत्तेतली ही भेदनीति नाही का? या भेदनीतिबाबत कोणीच उघड बोलायला तयार नसतो. सत्तेचा वाटा हा प्रत्येकाला हवाच असतो आणि त्यातून आलेल्या मस्तीतून अन्य जातींना दडपून कायम सत्तेच्या विंगेत आपणच राहू अशी तजवीज करण्याची धडपड कायम सुरू असते. हीही एकप्रकारची राजकीय भेदनीतिच आहे की नाही?
माझाच बाबासाहेब...!लातूर जिल्ह्यातील वाढवणा बु.।। येथे मातंग समाज मोठ्या प्रमाणावर आहे. महारवाड्यातील दहा-पंधरा घरे सोडली, तर चार-पाचशे घरांचा मांगवाडा आहे. मातंग समाजातील पहिली पिढी ही सन 1980 च्या दशकात शिकून मोठी झाली. ते बाबासाहेबांच्या विचारांनी झपाटले होते. बाबासाहेबांच्या हयातीत "जनता, मूकनायक, बहिष्कृत भारत' आदी वर्तमानपत्रांचे सामूहिक वाचन होत असे. बाबासाहेबांच्या विचारांमुळे मातंग समाजातील पहिल्या पिढीतील युवक डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी अशा मोठ्या हुद्द्यांवर व सरकारी नोकऱ्यांत काम करू लागले. त्यांना बाबासाहेबांच्या विचारांमुळेच आपण मोठे झालोत, सुटा- बुटात आलोत, ही जाणीव होती. परिणामी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. पहिली एक-दोन वर्षे डॉ. आंबेडकरांची जयंती मिरवणूक ही एप्रिल महिन्यात मांगवाड्यातूनच निघाली. शेवटी कोणाच्या तरी सांगण्यावरून महारांनी मात्र जयंतीवरून वाद उकरून काढला. तुम्हाला कोण सांगितले बाबासाहेब तुमचे आहेत? बाबासाहेब तर आमचेच आहेत! आम्हीच बाबासाहेबांची जयंती साजरी करणार आहोत! मग वाद कशाला? कोणीही जयंती साजरी केली तर काय फरक पडणार? म्हणून मातंग समाजाने या वादातून माघार घेत जयंतीची सूत्रे ही महारांच्या हाती दिली. तेव्हापासून डॉ. आंबेडकर जयंती मिरवणूक ही महारवाड्यातून निघते.
ज्यावेळी जयंतीची सूत्रे महारांच्या हाती मातंगांनी दिली, त्यावेळी जयंती सोहळ्यात मातंगांना महारांनी सामवून घेतले नाही. जयंतीपासून त्यांना चार हात लांब ठेवूनच त्यांनी आजपर्यंत ही जयंती साजरी केली आहे. त्यावेळी दोन समाजात केवळ माझाच बाबासाहेब...! म्हणून पडलेली भेदनीतिची ठिणगी आजही कायम आहे. महार मंडळीतील पुढच्या पिढ्या शिकल्या-सवरल्या, मात्र त्यांनी ही भेदनीति दूर करण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. यात दोष एकट्या मातंग समाजाचा कसा काय? ही वास्तवता महार मंडळी मान्य करायलाच तयार नसतात.
...दाखविण्याचे दात वेगळे !महार आणि अन्य दलित जातींमधल्या मधुर नातेसंबंधांबाबत बोलायचे झाले तर, महारमंडळींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. एखाद्या व्यासपीठावर भारत बौध्दमय करण्याच्या बाबासाहेबांच्या स्वप्नाविषयी बौध्द समाजातील बुद्धिवंत व्याख्यानातून ओरडतात, मात्र व्यासपीठावरून खाली उतरले की त्यांच्यातील भेदनीतिचा, उच्च-नीचतेचा, तुच्छतेचा रोग त्यांना सोडायलाच तयार नसतो. तो सोडायला म्हणण्यापेक्षा तेच हा रोग कायमचा घालवण्याचा प्रयत्न करीत नसतात. व्यासपीठावरून बोलणे तसे सोपे असते, मात्र वास्तवात वागणे, बोलणे आणि आचरणात आणणे खूपच अवघड असते. याची जाणीव असतानाही ही मंडळी बुध्दाची समता, बंधुत्वाची भाषा करतात, हेच आश्चर्य आहे. कशासाठी हा थोतांडपणा करायचा, हेच समाजाला आणि सुजाणांना कळायला मार्ग नाही.
ही तर बुद्धिवंतांकडून समाजाची, दलितांची, दलित चळवळींची आणि कार्यकर्त्यांची घोर फसवणूकच आहे. खरं तर या भेदनीतिबाबत आता बौध्द आणि महारांतील बुद्धिवंतांकडूनच मोठ्या प्रमाणावर काम होण्याची गरज आहे. भेदनीति संपविण्याची चळवळच आता राबवली पाहिजे. तरच भारत एक दिवस बौध्दमय होण्याची आशा आहे. अन्यथा बाबासाहेबांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे, यात तिळमात्र शंका नाही!
पोचीराम कांबळेंच्या हौतात्म्याचे काय?औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे, यासाठी झालेल्या नामांतर लढ्यात काही मातंग समाजातील आंबेडकरवादी युवकांचा, तरुणांचा सक्रीय सहभाग होता. त्यात पोचीराम कांबळेने हौतात्म्य पत्करले. पोचीराम कांबळेच्या हौतात्म्याची म्हणावी तशी नोंद महारांनी घेतलीच नाही. केवळ तो मातंग असल्याकारणाने आणि महारांत मातंगाप्रती पूर्वग्रहदूषितपणा असल्यानेच पोचीराम कांबळेंच्या हौतात्म्यानंतरही त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा महारांनी सन्मान केला नाही.
जर हा पोचीराम कांबळे महार, बौध्द असता तर त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून गावोगावच्या महारवाड्यात बाबासाहेबांच्या बाजूला त्याचे छायाचित्र झळकले असते. अनेक महारवाड्याच्या प्रवेशद्वाराला पोचीराम कांबळेचे नाव मिळाले असते. अनेक महारांच्या, बौध्दांच्या नव्या वस्त्यांना पोचीराम कांबळेनगर असे नाव मिळाले असते. मात्र पोचीराम कांबळेचे दुर्दैव असे की, तो मातंग समाजात जन्माला आला होता. मात्र अस्सल आंबेडकरवादी विचाराने झपाटलेला होता, म्हणूनच त्यांनी नामांतर लढ्यात उडी घेतली आणि आपल्या प्राणाची आहुती दिली. याचे किती महार मंडळी प्रामाणिक स्मरण करून त्याला अभिवादन करतात, हाही महत्त्वाचा आणि संशोधनाचाच भाग आहे.
केवळ बौध्द-मातंग भेदनीतितून पोचीराम कांबळेंच्या नामांतर लढ्यातील हौतात्म्याचा सन्मान केला जात नाही, तर ही भेदनीति नाही का? याला मातंग समाजात जन्माला आलेला पोचीराम कांबळे कारणीभूत आहे का? तरीही आम्ही भेदनीतिला अगदी घट्टपणे गत शेकडो वर्षांपासून आवळून बसलो आहोत. हीच बाबासाहेबांची नीति होती का? हाच बुध्दाच्या समतेचा धर्म होता का? जाती-जातीत तेढ आणि भेद निर्माण करणारे संकुचित वागणेच आम्ही सोडायला तयार नाही.
दलितांतील स्वयंघोषित सवर्ण...धर्मांतरानंतर आता आम्ही दलित नाहीत, असा डांगोरा पिटणारी महार मंडळी स्वत:ला स्वयंघोषित सवर्ण मानतात. आता आम्ही म्हणजे शुद्ध "ब्राह्मण' आहोत! आमची स्पर्धा ही कोण्या दलित जाती-जमातींशी नाही, तर ती स्पर्धा आहे केवळ ब्राह्मणांशी! अनेकांनी ब्राह्मण मुलींशी ठरवून विवाह केला. बाबासाहेबांनी रमाबाईंच्या नंतर ब्राह्मण मुलीसोबत म्हणजेच माईसाहेब यांच्याशी "रजिस्टर्ड मॅरेज' केले होते. म्हणून आम्हीही तोच आदर्श घेऊ, असे खूळ व प्रस्थ बाबासाहेबांच्या पश्चात समाजात वाढले. त्यातून केवळ एक "आसुरी आनंदाची भावना' उघड होते. अमुक एका जातीने आम्हाला हीन-दीन समजलं, अस्पृश्यतेची वागणूक दिली, म्हणून काहींनी सूडभावनेतूनच ब्राह्मण मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह केला आहे. काही अपवादही असतील, की दोघांच्या सहमतीने विवाह झाले असतील.
अन्य दलित जातींना खालच्या दर्जाचे समजत, आम्ही उच्च आहोत, दलितांतील सवर्ण आहोत, अशातला स्वयंघोषितपणा महार, बौध्दमंडळींकडून केला जातो. ही भेदनीति नाही का? आता आम्ही दलित नाही. दलित आहेत ते मांग, मातंग, ढोर, चांभार असे उघडपणे सांगितले जाते. मात्र आरक्षण आणि सत्तेचा फायदा लाटण्यासाठी दलित असल्याचा ऐनवेळी कांगावा केला जातो.
माजी खा. रामदास आठवलेंना शिर्डीतील पराभवानंतर दिल्लीच्या शासकीय घरातील सामान कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार बाहेर रस्त्यावर फेकण्यात आले, त्यावेळी "मी दलित असल्यामुळेच मला अशी वागणूक दिली गेली' असल्याची ओरड आठवलेंनी केली होती. ज्या ज्यावेळी अन्याय- अत्याचार झाला, त्या त्यावेळी मात्र दलितपणा आठवतो आणि ऍट्रॉसिटीचा कायदा आठवतो. स्वत:च्या स्वार्थासाठीच महारमंडळींनी ही भेदनीति पोसली आहे.
अंबुज-भोकऱ्यातील पराकोटीचा संघर्ष
एखादी मातंग अथवा महार समाजातील व्यक्ती नोकरीनिमित्त बाहेरगावी गेली असता तिला सर्वप्रथम तुम्ही अंबुज की भोकऱ्या, असे विचारले जाते. जर भोकऱ्या असला तर तिथल्या गावातील, कार्यालयातील भोकऱ्या असणारी मंडळी त्याला तात्काळ जवळ करतात. त्याच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करतात. मात्र अंबुज असला की जाऊ द्या, तो अंबुज अर्थात मांगाचा आहे, अशी हीनपणाची वागणूक कार्यालयातील भोकऱ्या अर्थात महारांकडून मिळते. हा संघर्ष आजचा आणि अचानक उद्भवलेला नाही. अंबुज म्हणजे मांग आणि भोकऱ्या म्हणजे महार हे शब्द तसे जुनेच आहेत. मात्र यातून दोन जातींतील संघर्ष आजही कायम आहे, हे आजही दिसून येते आणि हाच संघर्ष बाबासाहेबांना मान्य नव्हता. त्यांनी त्यासाठीच उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळेत महार-मांग वतन परिषद घेऊन हा भेद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा बाबासाहेबांचा प्रयत्न आणि हे विचार तेव्हाच्या महारांना पचनी पडले नाहीत. परिणामी बाबासाहेबांना त्यांनी या प्रकरणात सहकार्यही केले नाही.
बाबासाहेबांना दलितांतील सर्वच जाती आणि त्यांच्या दु:खाची जाणीव होती. ते स्वत: महार जातीत जन्मल्यामुळे अस्पृश्यतेचे भयानक चटके सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. या चटक्यांतूनच बाबासाहेबांना सन्मानाचा, मानवतावादी बुध्दाचा धम्म अधिक जवळचा वाटला. जरी बाबासाहेबांबरोबर मातंग समाजानेही धर्मांतर केले असते तरी हा अंबुज-भोकऱ्यांतला पराकोटींचा संघर्ष कायम राहिला असता. तो आजही आहे. हा अंतर्गत संघर्ष अखंडपणे धुमसत असतो. यावर कोणी भाष्य करायला तयार नसतो किंवा याबाबत मानवतावादी चळवळ राबवायलाही कोणी तयारच नसतो. मग भेदनीति कायम राहणार नाही तर काय होईल?
ऍट्रॉसिटी आणि महार समाज
दलित अत्याचार प्रतिबंधक अर्थात ऍट्रॉसिटी कायदा आणि महार समाज असा विचार केला तर महाराष्ट्रात या कायद्यांतर्गत सर्वाधिक गुन्हे सवर्णांवर दाखल झाले, ते महार समाजासोबतच्या संघर्षातूनच. महार समाज शिक्षित, पुढारलेला असल्याने सवर्णांकडून होणाऱ्या अन्यायाला प्रत्युत्तर देण्याची धमक महारांनी आपल्यात ठेवल्यानेच या ऍट्रॉसिटीच्या माध्यमातून जातीयवाद्यांची चरबी उतरविण्याचे काम केले आहे. त्यातूनच पुन्हा सवर्ण आणि दलित असा संघर्ष कायम राहिला आहे. यात मातंग समाजाकडून ऍट्रॉसिटी कायद्याचा वापर केवळ 5 टक्केच झाला असल्याचे दिसून येते. म्हणजे 95 टक्के वापर महार मंडळींनी केल्याचे दिसून येते. शक्यतो मातंग समाज या भानगडीत पडत नाही किंवा कोणावर छाती फुगवून भांडायला जातच नाही. मातंग समाज सहनशील असल्याने गावगाड्यात त्याच्याबाबतची अन्य जातींची भावना वेगळी आहे. तशी भावना महारांविषयी नाही. महारमंडळी अन्याय सहन करतच नाहीत. कायद्याच्या बाजूने त्यांना उत्तर देण्यासाठी अर्ध्यारात्री ते सज्ज असतात. मात्र त्याउलट मातंग, चांभार, ढोर आणि अन्य दलित जाती अन्याय सहन करतात, म्हणून त्यांची ही अवस्था आहे. "मुकी बिचारी कुणीही हाका' अशीच गत या अन्य दलितांची झाली आहे.
ऍट्रॉसिटीचा वापर सवर्णांच्या विरोधात कुठे कुठे जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे दिसून येते. तर काहीना हकनाक त्रास देण्यासाठी या कायद्याचा वापर जाणीवपूर्वक केला जातो. यातून दलित-सवर्णांतला संघर्ष आणखीन चिघळण्यात अधिकच मदत होते. पुढे त्याचे पर्यवसान एकमेकांचे मुडदे पाडण्यात होते. यात प्रामाणिक ऍट्रॉसिटी प्रकरण दाखल होण्याचे प्रमाण 75 टक्के असावे. उर्वरित 20 टक्के हे राजकीय डावपेचांतून, वैयक्तिक हेवेदाव्यांतून दाखल झाल्याचे दिसून येते.
दगडापेक्षा वीट मऊ!
ग्रामीण भागात एक म्हण आहे, "दगडापेक्षा वीट मऊ!' तीच पध्दत महार आणि मांगांबाबत सवर्ण, गावकऱ्यांनी आजपर्यंत पाळली आहे. महारांना अस्पृश्यतेच्या नावाखाली दूर लोटायचं आणि मांगांना मात्र जवळ करायचे. ही "फोडा आणि झोडा'ची नीति जातीयवाद्यांनी इंग्रजांकडून शिकली आहे. याचा फायदा असा आहे की, महारांविरुध्द मातंगांना सतत संघर्षरत ठेवायचे. परिणामी "दोघांचं भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ' अशीच गत गावगड्यात या दोन प्रमुख दलित जातींची झाली आहे. या दोन्ही जाती मांजरांच्या भूमिकेत आणि जातीयवादी मात्र माकडाच्या भूमिकेत वावरतात. या दोन मांजरांच्या वादात लोण्याचा गोळा मात्र माकड फस्त करते, हे वास्तव आहे. तरीही मातंग आणि बौध्दातली भेदनीति महारमंडळी जोपासण्यातच धन्यता मानतात. केवळ मातंगांना खालच्या दर्जाचे समजून आपला मोठेपणा मिरवण्यातच धन्यता मानतात. ही मानसिकता बदलण्यासाठी कोणाही बौध्द पुढाऱ्यांना पुढे यावेसे वाटत नाही. कारण बौध्दाएवढीच ताकद आणि लोकसंख्या मातंगांची आहे. परिणामी आपल्या सामाजिक आणि राजकीय अस्तिवावर परिणाम होईल यासाठीच हे एकत्र येण्यासाठी तयार होत नाहीत. कारण "तू बडा या मैं बडा' च्या नादात मात्र जातीयवाद्यांचे चांगलेच फावते. ही राजकीय षड्यंत्राची भाषा बौध्द आणि महार पुढाऱ्यांच्या, बुद्धिवंतांच्या लक्षात येते, मात्र यावर कुठलाही तोडगा आणि सामाजिक चळवळ ते राबवायला तयार नाहीत. कारण या लोकांना एका म्यानामध्ये दोन तलवारी कशा काय राहतील? या न्यायाने मातंगासोबतची भेदनीति कायम ठेवण्यातच अधिक भले आहे असे वाटते. मात्र याचा परिणाम फोडा आणि झोडाच्या माध्यमातून समाजावर जातीयवाद्यांकडून गत अर्धशतकात अन्याय, अत्याचार होण्यात झाला आहे. त्यातूनच खैरलांजी, अनिता बसवंते खून व बलात्कार प्रकरण, दिलीप शेंडगे, नरसिंग नाईकवाडे खून प्रकरण आणि सामूहिकरीत्या दलितांची घरे जळीतकांडासारख्या घटनांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
जर बौध्द, महार- मातंगांत भेदनीति नसती तर या अत्याचाराच्या घटना घडल्याच नसत्या आणि जातीयवाद्यांवर एकप्रकारे वचक राहिला असता. महार मंडळी अन्यायाविरुध्द पेटून उठतात आणि त्याचा सामना करतात म्हणून त्यांना जातीयवादी मंडळी दगडाची उपमा देतात. तर मातंग समाज हा सहनशील असल्याने तो निमूटपणे अन्याय, अत्याचार सहन करतो म्हणून त्याला विटेची उपमा दिली जाते. कारण महारांशी दोन हात करण्याची ताकद जातीयवाद्यांत नाही. त्यासाठीच "दगडापेक्षा वीट मऊ!' असे म्हटले जाते.
शिवसेना-भाजपा या राजकीय पक्षांना जातीयवादी अशी शिवी कॉंग्रेस-रिपाइंवाले देत असतात. परंतु तरीही मातंग समाजाला शिवसेना-भाजपा हे पक्षच जवळचे वाटतात. सेना-भाजपात मातंग समाजाचे आमदार अधिक आहेत. यामागे काय कारण असावे याचा शोध घेण्याचा प्रयत्न बी. व्ही. जोंधळेंसारख्यांनी करण्याची खरी गरज आहे. कॉंग्रेसमध्ये महारांना प्राधान्य दिले जाते. (कॉंग्रेस हे जळते घर आहे, त्यात जाऊ नका असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते, हे विशेष) अपवाद म्हणून काही असतात, तो भाग निराळा. तर ही भेदनीति ठेवायची की नाही, याचा विचार बौध्द आणि महारमंडळींनी करायला हवा.
महार-मांग शकून अपशकून...आजही महार समाज आणि मांग समाजाबद्दल काही चुकीच्या समजुती समाजात आहेत. ग्रामीण भागात या समजुती आजही नित्यनेमाने पाळल्या जातात. मांगा-महारांना गावकुसाबाहेर अस्पृश्य म्हणून ठेवण्यात आले असले तरी मात्र आजही महारा-मांगांबाबत अंधश्रध्दा पाळली जाते. सकाळी उठल्याबरोबर "मांगा'चे तोंड पाहिल्यानंतर धनप्राप्ती होते, असा गैरसमज आणि अंधश्रध्दा आहे. जर मांगाला पाहिल्यामुळे धनप्राप्ती होत असेल, तर सर्वच महाराष्ट्रातल्या मांगांना सवर्णांनी आपल्या घरीच "शो-पीस' म्हणून ठेवलेले बरे! ज्याचा चेहरा पाहिल्यामुळे धनप्राप्ती होते असे काही सवर्णांचे म्हणणे आहे, तर मग मातंग समाज आजही एवढ्या दारिद्र्यात आणि कंगाल अवस्थेत कसा काय जगतो आहे? मांग म्हणजे लक्ष्मी असेल, तर त्याच्या झोपडीत आणि अंगणात लक्ष्मी का नांदत नाही? हाही सवाल त्या सवर्णांनाच विचारला पाहिजे. तर महार समाजातील व्यक्तीचा चेहरा सकाळी पाहिल्यामुळे कामात अनेक संकटे आणि व्यत्यय येतात, अशी चुकीची समजूत आहे. तर मांग शकुन आणि महार हा अपशकुन समज आहे, हे खूळ केवळ जातीयवाद्यांकडून दोन समाजात फूट पाडण्यासाठीच जाणीवपूर्वक पेरण्यात आले आहे. याचा आता दलित चळवळीतील पुढारलेल्या आणि शिक्षित मंडळींनी विचार करायला हवा आणि दोन समाजातील तेढाला, भेदनीतिला तिलांजली दिली पाहिजे. तरच दलितांमधली ताकद दुपटीने वाढेल व सत्तेतला वाटा आणि दलितांची सत्ता यायला वेळ लागणार नाही. गरज आहे ती ही भेदनीति आणि समज-गैरसमज दूर करण्यासाठी लागणाऱ्या इच्छाशक्तीची.
महार-मांग संघटितपणा शक्याशक्य
महार-मांगांतील संघटितपणा शक्य आहे, मात्र त्यासाठी दोन्ही समाजाने अंगात मुरलेल्या अहंकाराला बाजूला सारलं पाहिजे. महार-मांग एकसंघ आणि संघटित झाले पाहिजेत, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मात्र त्यांच्या हयातीत त्यांना ते समाजाचे अन्य महत्त्वपूर्ण प्रश्न, समस्यांसाठी उभारलेल्या लढ्यामुळे शक्य झाले नाही. मात्र बाबासाहेबांना महार आणि मातंगांतली भेदनीति समूळ उखडून टाकायची होती. त्यासाठी त्यांनी मातंग समाजातील पुढाऱ्यांना तसे आवाहनही केले होते. बाबासाहेबांची उंची आणि त्यांच्या विचारांना मातंग समाजातील तरुण, शिक्षित वर्ग तसा सलाम करतो. बाबासाहेब म्हणजे एकट्या महारांची "प्रायव्हेट प्रॉपर्टी' नाही, हे ज्यांना ज्यांना कळाले त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांच्या वाटेवर मार्गक्रमण केले. त्यांच्या प्रेरणेतून त्यांनी स्वत:ची प्रगती साधली व ते मोठे झाले. ज्यांना बाबासाहेब म्हणजे महारांचे नेते, पुढारी होते. त्यांनी केलेले काम हे फक्त महारांसाठीच होते, असे ज्यांचे अज्ञान आजही कायम आहे, त्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. केवळ गैरसमजुतीतूनच दोन समाजांत भेदनीति कायम रुजली आणि पोसली गेली आहे. त्यासाठी हे दूर सारून एक संघटितपणा वास्तवात आणण्यासाठी महारांनी मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरले पाहिजे. दोन्ही समाजांतील पुढाऱ्यांनी मनावर घेतले आणि कामाला लागले, तर एकसंघटितपणा शक्य आहे, अन्यथा अशक्यही आहे.
धर्मांतरानंतरची वाताहत
महाराष्ट्रात काही मातंग समाजाने बौध्द धम्म स्वीकारला, मात्र त्यांची एकतर हिंदू समाजातून बाहेर पडल्यामुळे मातंग समाजातून मोठी अवहेलना झाली आणि पुढे बौध्दांनी म्हणण्यापेक्षा महारांनी न स्वीकारल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फरफट झाली आहे. एक तर ते हिंदू धर्मातूनही बाहेर फेकले गेले आणि बौध्दांनी अर्थात महारांनी न स्वीकारल्याने तिकडूनही बाहेर फेकले गेल्याने त्रिशंकूसारखे अधांतरीच लटकत राहिले आहेत. ही धर्मांतरानंतरची वाताहत आहे. अशा वागण्याने भारत बौध्दमय कसा काय होणार आहे? हे आता अलीकडच्या बौध्दांना, महारांना विचारले पाहिजे. धर्मांतराचे नाटक करता येत नाही. तेवढ्या सन्मानाने जर इथला बौध्द, महार समाज अन्य दलितांना स्वीकारणार असेल, तरच धर्मांतरासाठी ते पुढे येतील. त्याहीपेक्षा धर्मांतरानंतरचे प्रश्न आणि समस्या ह्या अतिशय भयानक आहेत.
उजळंब जि. लातूर येथील मातंग समाजातील सतिश नाईकवाडे हे तसे पूर्वीपासूनच आंबेडकरी विचाराने झपाटलेले कवी, लेखक आहेत. त्यांचा ओढा हा पूर्णत: बुध्दाच्या, धम्माच्या आणि आंबेडरांच्या विचाराकडे आहे. त्यांना धम्म स्विकारावा वाटत होता मात्र या भेदनितिमुळे आणि धर्मांतरानंतरच्या वाताहतीची कल्पना करूनच त्यांनी आपला विवाह हा हिंदू धर्मविधीनुसारच केला. त्यावेळी बौध्द समाजातील मंडळींनीच सतीशला म्हटले होते की, ही तर आंबेडकरांच्या विचारांशी केलेली बेईमानीच आहे. हे बालायला सोपे असते मात्र वास्तवात जगणे खूप अवघड असते. विशेषत: मातंगांना या धार्मिक सुरक्षिततेची, रोटीबेटीची हमी कोणती महार, बौध्द मंडळी देऊ शकतात?
महारांनी जरी बौध्द धम्माचा स्वीकार केला असला तरी ते रक्तात भिनलेली हिंदुसंस्कृती सोडू शकत नाहीत. नागपूरच्या दीक्षाभूमीवर प्रतिवर्षी विजयादशमीला महाराष्ट्रासह देशभरातला आंबेडकरप्रेमी समाज एकत्रित होतो. खरं तर बाबासाहेबांनी धर्मातर केल्याचा दिनांक हा कुठल्या हिंदू तिथीवर अवलंबून नव्हता. 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी निवडला होता. प्रत्येकवर्षी 14 ऑक्टोबरलाच दीक्षाभूमीवर भीमसैनिकांनी एकत्रित व्हायला हवे. तसे होतच नाही. ऑक्टोबर उजाडला की, हिंदू तिथिनुसार ज्या तारखेला विजयादशमी असेल त्यादिवशीच सर्व भीमसैनिक नागपूर मुक्कामी येतात. हा प्रकार म्हणजे आजही आम्ही धर्मांतराच्या अर्धशतकानंतरही हिंदू धर्म शास्त्राच्या आधारावर आणि तिथीनुसार आलेल्या तारखेवरच अवलंबून आहोत. मग आपण नेमके हिंदू की बौध्द? अशी गफलत कधीकधी महारांबाबत स्वत:लाच होते. याचे उत्तर ज्यांचे त्यांनीच द्यायला हवे. यासाठी आत्मपरीक्षण व आत्मनिरीक्षण हा एकच मार्ग आहे. त्यातून तुम्हाला हिंदू की बौध्द? याचे उत्तर प्रामाणिकपणे मिळू शकेल. बौध्द धम्मात जातीपाती पूर्णत: गळून पडतात. तेथे मानवता हा एकमेव धर्म असताना महार-मांग हा भेद कसा काय आणि कुठून आला? की महारांनी तो तसाच ठेवला?
रामदास आठवले म्हणतात...
एप्रिल महिन्यात रामदास आठवलेंचा नागपूर दौरा होता. त्यांनी आपल्या दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी जातीच्या आधारावच जणगणना व्हावी अशी मागणी केली आहे. जर रामदास आठवले यांनी बौध्द धर्म स्वीकारला असेल तर ते पुन्हा जातीच्या मुद्यावर का येताहेत? केवळ जातींचे राजकारण करण्यासाठी आठवलेंनी ही मागणी केल्याचे दिसून येते. आठवले म्हणतात देशात विविध जाती-जमाती असून त्यांचे प्राबल्यही आहे. त्यामुळे जनगणना जातीच्या आधारावर केल्यास जाती व्यवस्था बळकट होईल हा आरोप निराधार असून जनगणना जातीच्याच आधारावर व्हावी, असा धोशा त्यांनी नागपूर मुक्कामी लावला. पूर्वी स्वत:ला मागासवर्गीय म्हणवून घेण्याची लाज वाटत असे. आता मागासवर्गीय म्हणवून घेण्याची स्पर्धा लागली आहे. आता आरक्षणाची मर्यादा वाढवून 75 टक्के करण्यात यावी. जनगणनेचा अर्ज भरून देताना बौध्द लिहिल्यावर बाजूच्या रकान्यात पूर्वाश्रमीचे "हिंदू-महार' असे लिहावे लागते. म्हणून यावेळेस "अनुसूचित जाती' अशी नोंद करण्यात यावी अशीही मागणी आठवलेंनी केली आहे. धमार्ंतरानंतर 1962 मध्ये महाराष्ट्र शासनाने धर्मांतरीत बौध्दांना अनुसूचित जातींच्या सवलती देण्यात याव्यात असा अध्यादेश काढला होता.
रोटीबेटी व्यवहाराचे काय?
महार आणि मांग या दोन्ही समाजांचे खानपान एक आहे. दोघेही सनातन हिंदूधर्माकडून बहिष्कृत, व्यवसाय स्वातंत्र्य व अन्य मूलभूत मानवी अधिकारांपासून नाकारलेले आहेत. मग दोघांच्याही चालीरीती सारख्या असताना थेट रोटीबेटीचा व्यवहार महार समाज मांगांसोबत का करीत नाही? मांगांसोबत तो रोटीबेटीचा ज्या दिवशी व्यवहार करायला लागेल, त्या दिवसापासून भारतात बौध्दमयतेची चळवळ गती घेईल. पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणारा आणि पुढारलेला महार, बौध्द समाज जर स्वत:ला देवपूजेतून, जुन्या चालीरीतीतून बाहेर काढू इच्छित नाही, तर हे समाजपरिवर्तन कसे घडणार आहे? मातंग समाज आजही हिंदू धर्म सोडू शकतो, मात्र त्याला धर्मांतरानंतरची सुरक्षितता आणि रोटीबेटी व्यवहाराची हमी कोण देणार आहे ? कोणा बौध्द पुढाऱ्यात एवढी धमक आहे ? आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या तरुणांना बौध्द आणि महार समाजांकडून कसा सन्मान मिळतो, यावरच मातंग समाज धर्मांतराबाबतचा विचार करून चार पावले मागे हटतो. तर इकडे महाराष्ट्रातला बौध्द अर्थात महार समाज आजही मांगांना खालच्या दर्जाचा समजतो. ही भेदनीति आपण आणखी किती दिवस बाळगणार आहोत? जोपर्यंत या दोन समाजांत, जातींत रोटीबेटीचा व्यवहार होत नाही, तोपर्यंत भेदनीति संपुष्टात येत नाही.
बी.व्ही. जोंधळेंची "महार'मय पत्रकारिता
मराठवाड्यातील औरंगाबादचे मुक्त पत्रकार म्हणून बी. व्ही. जोंधळे यांची पत्रकारिता म्हणजे "महार'मय पत्रकारिता आहे. त्यांचे लेखन हे दलित चळवळ आणि बौध्द धम्म, त्याचबरोबर हिंदूविरोधी असते. प्रत्येक लेखात त्यांनी मांडलेली वस्तुस्थिती ही वास्तवाला बगल देत मांडलेली असते. त्यात ते स्वत:च्या महार समाजाची भूमिका स्पष्टपणे मांडण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक टाळतात. महार समाज म्हणजे बुध्दाचे तत्वज्ञान कोळून प्याला आहे. प्रत्येकाला बुध्दत्व प्राप्त झाल्याच्या आविर्भावात ते लेखन करतात. 14 एप्रिलच्या "लोकसत्ता'त त्यांनी बौध्द-मातंग भेदनीति कशासाठी? या लेखात महारांची वास्तव बाजू मांडलीच नाही. त्यात त्यांनी महार, बौध्द खूपच मानवतावादी आहेत आणि त्यांनी अन्य दलितांच्या कल्याणासाठी बरेच प्रयत्न केले, तरीही मातंग समाज आणि अन्य दलित जाती प्रगती करायला तयार नाहीत. आपल्या मागासलेपण बौद्धांमुळे असे समजून बौध्दांना उगीच शिव्याशाप देतात आणि तिरस्कार करतात, असा जावईशोध त्यांनी आपल्या लेखनात कुठलेही वास्तव न मांडता लावला आहे. त्यांची ही पत्रकारिता म्हणजे "महार'मय आहे, असेच दिसून येते.
राजकुमार जोंधळे, लातूर.
9049072778